सिमेंट बल्करमधून अडकलेल्या पाच जणांना ४ तासांनी काढले सुखरूप
अक्कलकोट / अमोल फुलारी
रात्रीची निरव शांतता, सर्वत्र काळोख, कडाक्याची थंडी, रस्त्याने जाणारी वाहने, अशातच रस्त्याच्या बाजूला सिमेंटने भरलेली बल्कर गाडी आणि सगळी चाके आकाशाकडे झालेल्या अवस्थेत पडली होती. त्याच वाहनात चालकाच्या केबिनमध्ये ५ निष्पाप जीव अडकले होते. ही घटना आहे अक्कलकोट वागदरी रोडवरील शिरवळ जवळची.
दि २० रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता शिरवळ ता ( अक्कलकोट ) जवळ भरदाव वेगाने जाणारे सिमेंट बल्करगाडी चालकाचा ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या भल्यामोठ्या खड्यात पलटली होती. कोणीतरी ११२ नंबर फोन करून पोलीस ठाण्यास कळवले. अवघ्या वीस मिनिटात पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. केबिन मधून जोरात किंचाळण्याचा, ओरडण्याचा, विव्हळण्याचा आणि जोरात रडण्याचा आवाज ऐकून उपस्थिताचे मन सुन्न झाले होते. अपघातग्रस्त वाहनाच्या केबिन मध्ये बसलेल्या ५ जण अडकले होते. कोणाचा हात तर कोणाचा पाय, कोणाची मान तर कोणाची बोटे अडकली होती, काही जणांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. रक्तस्त्राव होत होता. आता या ५ लोकांना सुखरूप बाहेर कसे काढायचे यासाठी वेगवेगळी युक्ती लढवली गेली. तात्काळ जेसीबी,क्रेन व हायड्रा मागवून घेऊन कोणालाही दुखापत न होता सुखरूपपणे व सुरक्षित बाहेर काढले. साडेनऊ वाजता सुरू झालेले मिशन मध्यरात्री दीड पर्यंत हे चालू होते.
गुलबर्गा ते सोलापूर जाणारे एकाच घरातील चार प्रवाशी व एक चालक लाडप्पा माळी रा सलगर असे पाच जणांना पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्तांचे प्राण वाचवून खाकी वर्दीतील माणूसकीचे दर्शन घडले. पाच जणांचे प्राण वाचवण्यासाठी पोलिस व ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी ,सपोनि महेश भविकट्टी , पोसई मुजावर ,वेंकटेश सुतार , पोलीस हवालदार विपिन सुरवसे, राम चौधरी, बशीर शेख, अनिल चव्हाण, गजानन शिंदे, सतिश आवले, लिंगय्या स्वामी, रणजीत अवताडे इत्यादी पोलीस अंमलदार व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.