तरुण भारत संवाद प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट शहरात आज, बुधवारी (दि.10) तीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात एका पुरुषाचा तर दोन महिलांचा समावेश आहे. यातील कोरोना बाधित एक पुरुष व महिला ही मौलाली गल्लीतील आहे. तर एक महिला समर्थ नगर येथील रहिवासी आहे.
या पैकी दोन व्यक्तीनी सोलापूर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेला असून तेथेच स्वॅब नमुने घेतलेले आहेत. उर्वरित एका व्यक्तीने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे स्वॅब घेतला असून तेथेच त्या व्यक्तीवर उपचार चालू आहेत अशी माहिती तहसिलदार अंजली मरोड यांनी दिली.
एकाच दिवशी अक्कलकोट शहरात तीन कोरोना रुग्ण मिळाल्याने नागरिकात खळबळ उडाली आहे. यापूर्वी अक्कलकोट शहरात ८ कोरोना रुग्ण मिळाले होते. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून उर्वरित सात जण कोरोना मुक्त झाले आहेत.