प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट ता.२५ घरातील बेडरूममध्ये खेळण्यासाठी बांधलेल्या साडीच्या झोक्यावर झोका घेऊन खेळत असताना गळफास लागून सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेची उत्तर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की या घटनेची खबर मुलीचे वडील डॉ.शिवपुत्र काशिराम गुरव वय ३६ रा.समर्थ विहार, मैंदर्गी रोड अक्कलकोट यांनी दिली. मयत सात वर्षीय मुलीचे नाव अभिलाषा शिवपुत्र गुरव असे आहे. मुलीचे वडील व आई हे आज सकाळी ९ वाजता कामानिमित्त गावात गेले होते व मुलगा निरंजन व मुलगी अभिलाषा हे दोघे घरी खेळत होते. मुलीचे आई-वडील बाहेरून पावणेदहाच्या सुमारास घरी आल्यावर घरातील बेडरूमचा दरवाजा बंद दिसल्याने पत्नी दरवाजा उघडणेकरिता गेली असता दरवाजा उघडला नाही.
त्यामुळे दोन्ही मुलांना हाक मारत ते बाहेर येऊन खिडकीतून पाहिले असता मुलगी अभिलाषा ही बेडरूममध्ये साडीने बांधलेल्या झोक्याला लटकलेली दिसली. त्यावेळेस आई-वडिलांनी घरातील पारीने बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून पाहिले असता मुलगी अभिलाषा ही साडी ने बांधलेल्या झोक्यावर झोका खेळत असताना गळफास लागून बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिला लगेच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरता घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. याचा अकस्मात मयतचा तपास एपीआय राठोड हे करीत आहेत.