ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊनमध्ये बंद असलेले उद्योग व मोठे व्यवसाय आता हळूहळू सुरु होत आहेत. त्यामुळे औद्योगिक व महत्वाच्या उच्चदाब वीजग्राहकांकडे विशेष लक्ष देऊन अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच बिलिंगसंदर्भातील प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पुणे प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांनी वेबिनार संवादात दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मोठे मॉल्स व व्यावसायिक इतर असे महत्वाचे मोठे वीजग्राहक यांच्यासाठी गेल्या आठवड्याभरात महावितरणकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध प्रश्नांवर चर्चा व संवादाचे आयोजन केले होते. यामध्ये पुणे जिल्हयातील अंदाजे 280 वीजग्राहकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 920 उद्योजक व महत्वाचे मोठे ग्राहक सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी थेट संवाद साधला.
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांशी संवाद साधण्यासाठी वेबिनार किंवा व्हीडीओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. त्याप्रमाणे उद्योजक व महत्वाच्या मोठ्या वीजग्राहकांसाठी प्रादेशिक कार्यालय स्तरावर वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चाकण, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, हडपसर, मुळशी, शिक्रापूर, जेजुरी, बारामती, रांजणगाव, सणसवाडी आदी भागातील 255 उद्योजक तसेच महत्वाचे मोठे 27 ग्राहक सहभागी झाले होते.