मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्या खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. संजय राऊत यांनी याचीच मदत घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, अखंड साथ.अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे..तो दिवस लवकरच उगवेल..आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
तसेच माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत आज म्हणाले की, उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडण्यात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका आहे. भाजपने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला नाकारल्यानंतर संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू सातत्याने लावून धरली. भाजपने अनेक मार्गांनी शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचा प्रत्येक वार पलवटून लावला. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाविकासआघाडी प्रत्यक्षात आकार घेण्यास पुरेसा कालावधी मिळाला. यानंतरही संजय राऊत यांनी अनेकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे व करत आहे.