समाजवादी पक्षासोबत आघाडी नाही
वृत्तसंस्था/ सहारनपूर
आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी होणार नसल्याचे शनिवारी स्पष्ट केले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत मागील एक महिन्यापासून माझी चर्चा होत होती. परंतु दलितांसोबत आघाडी न करण्याची भूमिका अखिलेश यांनी घेत माझा अपमान केला आहे. दलितांचे नेतृत्व उभे न राहू देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे.
बढतीतील आरक्षणाच्या मुद्दय़ावर समाजवादी पक्ष साथ देत नव्हता. भाजपप्रमाणेच अखिलेश यादव देखील दलितांची फसवणूक करत आहेत. अखिलेश यांनी आमचे मुद्दे मांडावेत अशी आमची इच्छा होती, परंतु ते टाळाटाळ करत असल्याने आम्ही आघाडीत सामील न होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा चंद्रशेखर यांनी केला आहे.
मुलायम सिंह यादवांना काशीराम यांनी मुख्यमंत्री केले, परंतु त्यांनी विश्वासघात केला. यावेळी देखील दलित समुदायासोबत असे घडावे अशी आमची इच्छा नाही. भाजपला रोखण्यासाठी मी माझा स्वाभिमान पणाला लावला होता. उत्तरप्रदेशात भाजपला पराभूत करणे आमचे लक्ष्य आहे. परंतु अखिलेश यांना दलितांची गरज नसल्याचे विधान त्यांनी केले आहे.
दलितांसाठी आम्ही 25 टक्के आरक्षणाची मागणी केली आहे, परंतु विरोधी पक्ष दलितांच्या मुद्दय़ांवर बोलणे टाळत आहेत. दलित स्वतःची लढाई स्वतःच लढतील. विखुरला गेलेला विरोधक एकत्र आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. मागील 5 वर्षांमध्ये समाजवादी पक्षाने दलितांच्या हत्या आणि त्यांच्या शोषणावर आवाज उठविला नसल्याचा दावा चंद्रशेखर यांनी केला आहे. तत्पूर्वी आझाद समाज पक्षाचे प्रमुख असलेल्या चंद्रशेखर यांना पत्रकार परिषद घेण्याची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.