मुख्यमंत्री स्वतः रेकॉर्डिंग ऐकत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ लखनौ
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मनोज यादव आणि जैनेंद्र यादव, सप प्रवक्ते राजीव राय यांच्या घरी प्राप्तिकर विभागाच्या छापे टाकण्यात आले होते. याप्रकरणी अखिलेश यांनी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत असल्याचे म्हटले आहे. उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार आमचे फोन टॅप करत आहे. दररोज संध्याकाळी मुख्यमंत्री योगी हे फोन टॅपिंगचे रेकॉर्डिंग स्वतः ऐकत असल्याचा आरोप अखिलेश यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सप नेत्यांच्या घरांवरील छापेमारी भाजप निवडणूक हरणार असल्याचा संकेत असल्याचा दावा अखिलेश यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी ‘युपी प्लस योगी’ उपयोगी’ असे म्हटले होते. यावर योगी हे अनुपयोगी असल्याची टीका अखिलेश यांनी केली आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळातील पटकथाच भाजप राबवत आहे. मुख्यमंत्री योगी हे अनुपयोगी असून त्यांना संगणक आणि स्मार्टफोन देखील हाताळत नाही. कुणी त्यांना संगणक दाखविल्यास ते घाबरत असल्याची टीका सप अध्यक्षांनी केली आहे. केंद्रीय मंत्री अजय टेनी मिश्रा यांना सरकार वाचवत आहे. भाजपला राज्यात पराभवाची भीती सतावू लागली आहे. सरकारकडून निषाद समुदायाची फसवणूक करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. अनुपयोगी मुख्यमंत्र्यांच्या काळात तरुणांना रोजगार मिळत नाही आणि परीक्षा देखील होत नाहीत. तरुणाई, शेतकरी त्रस्त असून सरकार त्यांचे म्हणणेच ऐकून घेत नसल्याचे अखिलेश म्हणाले.