‘भाजप’ची कोरोना लस घेणार नसल्याचे वक्तव्य : माफीची मागणी
लखनौ / वृत्तसंस्था
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाच्या लसीबाबत अजब आणि धक्कादायक विधान केले आहे. माझा भाजपावर विश्वास नाही. त्यामुळे मी भाजपाच्या सरकारकडून देण्यात येणारी कोरोनावरील लस घेणार नाही, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपसह अन्य पक्षांनी त्यांच्या माफीची मागणी केली आहे. तसेच त्यांचे हे विधान म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचा आणि कोरोनायोद्धय़ांचा अवमान असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे आता कोरोनाच्या लसीकरणाबाबत राजकारणालाही सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपाला टोला लगावताना जे सरकार टाळय़ा आणि थाळय़ा वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळय़ा आणि थाळय़ा वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही, असे अखिलेश यांनी म्हटले आहे. त्यांनी भाजपवर खोटी आश्वासने दिल्याचा आरोपही केला आहे. गेल्या काही वर्षांत देशाने खूप कठीण दिवस पाहिले आहेत. एवढे वाईट आणि काळे दिवस आम्ही पाहिले नव्हते, असेही ते पुढे म्हणाले.