ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. उत्तर प्रदेशात सत्ता आणण्यासाठी सर्व पक्षांनी कम्बर कसली आहे. खास करून समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खिलेश यादव (Akhilesh Yadav Former Chief Minister of Uttar Pradesh) सत्ता आणण्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी करत आहेत. पण अखिलेश यादव यांनी सोमवारी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये होणार आहेत. सध्या अखिलेश यादव हे आझमगडमधून सपाचे खासदार आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव यांना समाजवादी पार्टीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानलं जात होतं, परंतु आपण निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, “समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) यांची राज्यातील निवडणुकासाठी युती झाली आहे. आरएलडीसोबत आमची युती ठरली असून लवकरच जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.” तसेच निवडणुकीत काका शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टी लोहियाला (पीएसपीएल) सोबत घेण्याच्या शक्यतेवर ते म्हणाले, “मला त्यांच्यासोबत युती करण्यात कोणतीही अडचण नाही. त्यांना आणि त्यांच्या पक्षातील लोकांना योग्य आदर सन्मान दिला जाईल.”
दरम्यान, “२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सर्व स्तरातील लोकांनी आपल्या पक्षाला राज्यात सत्तेवर आणण्याचा निर्णय घेतला आहे,” असा दावा अखिलेश यादव यांनी रविवारी केला. तसेच सपा सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेश पुन्हा समृद्धीच्या मार्गावर येईल, असं हरदोई येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले.