प्रतिनिधी / बेळगाव
आनंदवाडी-वडगाव येथील ढोर समाजाच्या महिला सदस्या, अखिल भारतीय ढोर कक्कय्या महिला मंडळाच्या स्थापनेबाबत विशेष बैठक पार पडली. वडगाव येथील ढोर गल्लीत ही बैठक झाली. यावेळी अश्विनी श्रेयकर यांनी, महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता घराच्या बाहेर पडून समाजासाठी काही तरी केले पाहिजे. महिलांमध्ये भरपूर प्रतिभा असतात. त्यांचा वापर समाज विकासासाठी करावा, असे सांगितले. महिलांसाठी व्यासपीठ मिळत नाही, त्यामुळे महिलांना चार भिंतींपर्यंत मर्यादित ठेवले जाते. त्या बाहेर आल्या पाहिजेत आणि समाजाच्या विकासासाठी आपल्या समाजातील महिला संघटना उभी केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
या बैठकीत महिलांच्या विकासाबरोबर महिलांच्या आरोग्याबाबत चर्चा करण्यात आली. समाजातील अनुसूचित जातीतील महिलांसाठी शासनाच्या सोयी-सुविधा पुरविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला ढोर कक्मकय्या समाजाच्या श्रेयकर, पोळ, नारायणकर, गजाकोश आदी बांधव उपस्थित होते.