निफ्टी 568 अंकांनी प्रभावीत : ओएनजीसी सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. जवळपास दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स तब्बल 1,939.32 अंकांनी गडगडल्याचे पहावयास मिळाले आहे. बॉण्ड बाजारामधील परतावा वाढल्याने सोबत गुंतवणूकदारांची जोखीम वाढत गेली यामुळे इक्विटी बाजारातून दूर होत गेल्याने जागतिक पातळीवर चौफेर नफा कमाई झाल्याने प्रमुख समभाग मोठय़ा प्रमाणात कोसळल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर मात्र बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1,939.32 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 49,099.99 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक दिवसअखेर 568.20 अंकांनी घसरणीसह 14,529.15 वर बंद झाला आहे.
दिवअसखेर सेन्सेक्समधील प्रमुख 30 कंपन्यांचे समभाग घसरणीमध्ये राहिले असून यामध्ये सार्वधिक नुकसानीत ओएनजीसीचे समभाग 6.50 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले आहेत. यासोबतच महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, ऍक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले आहेत.
मुख्य विभागांची कामगिरी
प्रमुख निर्देशांकाची कामगिरी पाहिल्यास यामध्ये बँकेचा निर्देशांक हा 4.8 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे. दुसरीकडे आर्थिक आणि दूरसंचार विभागाचा निर्देशांकही अनुक्रमे 4.9 आणि 3.85 टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील अन्य बाजारामध्येही शुक्रवारी मोठी घसरण नोंदवली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारनंतर सुरु झालेले युरोपमधील मुख्य बाजारांमधील कामगिरीचा कल घसरणीत राहिला होता.
अभ्यासकांच्या माहितीनुसार बॉण्ड बाजारामधील मिळणारा परतावा हा वेगाने वाढत गेल्याने गुंतवणूकदारांची जोखीम वाढत गेली यामुळे समभाग खरेदीमधील कल कमी होत जात मोठय़ा प्रमाणात समभाग विक्री झाल्याने देशातील शेअर बाजार हजारोच्या अंकांनी प्रभावीत होत बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूडचे भाव हे 1.16 टक्क्यांच्या घसरणीसह 65.34 डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्याची नोंद केली आहे.