वृत्तसंस्था/ ऑकलंड
भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडला 3-0 असे एकतर्फी पराभूत केले. नवनीत कौर (दोन गोल) व शर्मिला (एक गोल) यांनी चमकदार कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर भर दिला. पण, पहिल्या दोन सत्रात एकही गोल नोंदवता न आल्याने मध्यंतरापर्यंत गोलपाटी कोरी होती. तिसऱया सत्रात भारतीय महिलांना दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले खरे पण त्यातील एकाही पेनल्टीवर त्यांना गोल नोंदवता आला नाही. अखेरीस चौथ्या सत्रात नवनीत कौरने 45 व्या मिनिटाला शानदार गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 54 व्या मिनिटाला शर्मिलाने सुरेख गोल नोंदवत भारताकडून दुसरा गोल नोंदवला. यानंतर, 58 व्या मिनिटाला नवनीतने पुन्हा एकदा गोल नोंदवत भारतीय संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी प्राप्त करुन दिली. भारतीय संघाच्या या जोरदार धक्क्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या किवीज महिला संघाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. अखेरीस भारतीय महिलांनी हा सामना 3-0 असा एकतर्फी जिंकला.
विशेष म्हणजे, पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिल्या सामन्यात न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघावर विजय मिळवला होता. यानंतर, दुसऱया व तिसऱया सामन्यात न्यूझीलंडच्या वरिष्ठ महिला संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. पण, चौथ्या सामन्यात इंग्लंडला तर पाचव्या सामन्यात न्यूझीलंडला नमवत भारतीय महिलांनी या दौऱयाचा गोड समारोप केला.