प्रतिनिधी/ म्हापसा
गेल्या आ” महिन्यापासून कोविडच्या कारणावरून स्तब्ध झालेला म्हापसा शुक्रवारचा बाजार अखेर शुक्रवारी पुन्हा सुरू झाला. यामुळे बाजारात बसणाऱया विक्रेत्यांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या पालिकेच्या बैठकीत म्हापसा बाजारपेठ पुन्हा पूर्ववत सुरू करावा अशा एकच मागणीवर नगरसेवकांनी जोर धरला होता. व मार्केट पुन्हा सुरू करावे अशी मागणी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्याकडे केली होती.
नगरसेवकाच्या मागणीच्या जोरावर नगराध्यक्षांनी बाजारपेठ सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखविल्याने नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला होता. नगरसेवक तुषार टोपले यांनी बाजारपेठ सुरू करताना सोशल डिस्टन्स सांभाळून विक्रेत्यांना बाजारपेठेत बसण्यास द्यावे तसेच कोविडच्या काळात काही स्थानिक व्यापारी आपला माल बाजारपेठेत अन्यत्र घेऊन बसत होते त्यांनाही बाजारपेठेत सामावून घ्यावे अशी मागणी केली होती याचवेळी नगरसेवक राजसिंग राणे यांनी कोविडच्या काळात अपापल्या वॉर्डात रस्त्याच्या बाजूला स्थानिक नागरिकांनी आपला छोटा धंदा करून काही ठिकाणी सामानाची विक्री केली होती. त्यांच्याकडे पालिकेने दुर्लक्ष करू नये अशी मागणी केली होती. हे सर्व लक्षात घेऊन म्हापसा पालिकेने शुक्रवारपासून बंद पडलेला शुक्रवारचा बाजार पुन्हा सुरू केला आहे.
दरम्यान याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, कोविड पूर्वी जे बाजारपेठेत आपले सामान विक्रीस घेऊन बसले होते त्या सर्वांना आतमध्ये सामावून घेण्यात आले आहे. बाजारपेठ पूर्वपदावर येण्यासाठी निदान तीन आठवडे जाणार असल्याची माहिती ब्रागांझा यांनी दिली. आता नवनवीन विक्रेते येऊ लागल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला आहे त्यांनाही सामावून घेण्यात येईल.
म्हापसा मतदारसंघात नरकासूर प्रतिमा दर वर्षीप्रमाणे होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिली. कोविडचे काही नियम काहीप्रमाणात लागू असेल. पणजी महापौराने काही नियम घातले आहे मात्र म्हापशात तसे काही नियम घालण्यास आलेले नाही. सर्वांनी या उत्साहात कोविडचे पालन करून सहभागी व्हावे असे ते म्हणाले. येत्या 4 नोव्हेंबरला आमचा पालिकेचा कार्यकाळ संपत असल्याने आम्ही अद्याप कोणालाही परवानगी दिली नाही. ऐन 2 दिवस असताना नागरिक परवानगीसाठी पालिकेकडे येतात. तोपर्यंत नवीन प्रशासन पालिकेत असल्याचे ते म्हणाले.