आटपाडी / प्रतिनिधी
बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी पोलिसांना चकवा देत शुक्रवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे बैलगाडी शर्यत पार पाडली. या शर्यतीत दहाहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला. तर परिसरातील बैलगाडी शौकिनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
दरम्यान, बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे. न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. पण भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर बैलगाडी शर्यत भरवण्यावरून चांगलेच आक्रमक झाले होते. ते बैलगाडी शर्यत घेण्याच्या मुद्द्यावर ठाम होते. परंतु शर्यतीच्या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि संचारबंदी लागू केलेली असतानाही पोलीस-प्रशासनाला चकवा देऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी वाक्षेवाडीच्या पठारावर सूर्योदयासोबत बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पाडले. शर्यतीनंतर आमदार पडळकर यांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर उभारणाऱ्या आंदोलनाला साथ देण्याचे आणि तरुणांनी शांततेत घरी जाण्याचे आव्हान केले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदीचा आदेश झुगारून झरेत बैलगाडी शर्यतीच्या मैदाचे आयोजन केले होते. या शर्यत होऊ नये म्हणून पोलिसांनी मैदान उध्वस्त केले होते. झरे परिसरात कडक पोलिस बंदोबस्तही ठेवला होता. तसेच संचारबंदी लागू केली होती. शर्यतीसाठी काल रात्री माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माणचे आमदार जयकुमार गोरे झरेत दाखल झाले होते. मध्यरात्री गनिमी काव्याने शर्यतीचे ठिकाण बदलून वाक्षेवाडीच्या पठारावर शर्यती घेण्याचे नियोजन केले.