सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजीचे वारे : युरोपीय बाजारात मजबूत स्थिती
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारातील मागील पाच सत्रांमधील घसरणीला अखेर चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी पूर्ण विराम मिळाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मजबूतीमुळे सेन्सेक्स 367 अंकांनी वधारत बंद झाला आहे. अन्य कामगिरीत युरोपीयन शेअर बाजारात मजबूत कल राहिला होता. ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी, ऍक्सिस बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या मदतीने बाजार तेजीसह बंद झाला आहे.
गेली पाच सत्रे सेन्सेक्स घसरणीत होता. त्यातही सोमवारची घसरण तर गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी ठरली होती. मंगळवारी सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स 366.64 अंकांनी वधारुन 57,858.15 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 128.85 अंकांच्या मजबूतीसह 17,277.95 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक म्हणजे 7 टक्क्यांनी लाभात राहिले आहेत. यासोबत ऍक्सिस बँक, स्टेट बँक, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि एनटीपीसीमध्ये प्रमुख तेजीचा कल राहिला होता. दुसऱया बाजूला विप्रो, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि. आणि आरआयएल यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
आशियातील अन्य बाजारांपैकी हाँगकाँगचा हँगसेंग, चीनमध्ये शांघाय कम्पोजिट निर्देशांक, जपानमध्ये निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी नुकसानीसह बंद झाला आहे. साधारणपणे युरोपातील बाजारात दुपारपर्यंत ट्रेडिंगमधील कल तेजीत राहिला होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.89 टक्क्यांनी मजबूत झाल्याचे दिसून आले.
यासह शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आकडा हा सोमवारी 3,751.58 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे. अखेर बाजार स्थिरावल्याचेच दिसले.