सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सहज विजय, अनुभवी वॅटसन-रायुडूची तिसऱया गडय़ासाठी 81 धावांची भागीदारी
वृत्तसंस्था/ दुबई
शेवटच्या 5 षटकात 51 धावांची आतषबाजी करणाऱया चेन्नई सुपरकिंग्स संघाने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात सहज विजय संपादन करत या हंगामातील आपली सलग पराभवाची मालिका देखील खंडित केली. प्रारंभी, निर्धारित 20 षटकात 6 बाद 167 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर चेन्नईने हैदराबादला 8 बाद 147 धावांवर रोखले.
शेवटच्या षटकात 22 धावांची गरज असताना शाहबाज नदीमला पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव घेता आली नाही आणि तिसऱया चेंडूवर तो ब्रेव्होकडेच परतीचा झेल देत बाद झाला. उर्वरित 3 चेंडूत 18 धावांची म्हणजे तिन्ही चेंडूंवर षटकार फटकावण्याची गरज असताना हे खडतर आव्हान हैदराबादला अजिबात पेलवले नाही.
प्रारंभी, आघाडीतील 4 पैकी 3 फलंदाज अपयशी ठरल्याने याचा हैदराबादला मोठा फटका बसला. डावखुरा वॉर्नर (13 चेंडूत 9), मनीष पांडे (3 चेंडूत 4) व जॉनी बेअरस्टो (23) स्वस्तात बाद झाले. केन विल्यम्सनने एकाकी किल्ला लढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, त्याला दुसऱया बाजूने यथोचित साथ लाभली नाही. विल्यम्सनने 39 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. प्रियम गर्ग 16 तर विजय शंकर 12 धावांवर बाद झाले. अंतिमतः हैदराबादला 8 बाद 147 धावांवर समाधान मानावे लागले.
चेन्नईची फटकेबाजी
चेन्नई सुपरकिंग्स संघाने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेन वॅटसन व अम्बाती रायुडू यांनी तिसऱया गडय़ासाठी साकारलेली 81 धावांची भागीदारी चेन्नईसाठी महत्त्वाची ठरली. वॅटसनने 38 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 42 तर अम्बाती रायुडूने 34 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 41 धावा जमवल्या.
सनरायजर्सने अभिषेक शर्माऐवजी नदीमला तर चेन्नईने एन. जगदीशनऐवजी पियुष चावलाला संघात स्थान दिले. सॅम करण यावेळी कारकिर्दीत दुसऱयांदाच सलामीला उतरला. येथे त्याने 21 चेंडूत जलद 31 धावांची फटकेबाजी केली. मात्र, सहकारी सलामीवीर फॅफ डय़ू प्लेसिस (0) आपल्या पहिल्याच चेंडूवर यष्टीमागे सोपा झेल देत बाद होणे धक्का देणारे ठरले.
डावातील दुसऱया षटकात सामन्यातील पहिला चेंडू खेळणाऱया प्लेसिसचा अंदाज खूपच चुकला. आऊटसाईड ऑफस्टम्पवरील चेंडू अधिक वेगाने उसळून येईल, असा त्याचा होरा होता आणि त्या दृष्टीने त्याने बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्यक्षात चेंडू त्या वेगात आला नाही आणि बॅटची कड घेऊन मागे गेल्यानंतर यष्टीरक्षक बेअरस्टोने आपली जबाबदारी चोख पार पाडली. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर वॅटसनविरुद्धही पायचीतचे जोरदार अपील झाले होते. पण, पंचांनी ते फेटाळून लावले.
सॅम करणने डावातील तिसऱया षटकात अहमदला डावातील पहिल्या षटकारासाठी पिटाळून लावले. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने दुसरा षटकारही वसूल केला. नंतर उत्तूंग फटकेबाजीच्या प्रयत्नात डावातील पाचव्या षटकात करण बाद झाला. संदीप शर्माने त्यालाही तंबूचा रस्ता दाखवला. संदीपने येथे अराऊंड द विकेट मारा करत त्रिफळाचीत केले.
मधल्या फळीतील अनुभवी अम्बाती रायुडूने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली तर वॅटसनने नवख्या नटराजनला स्लोअर वनवर बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने षटकारासाठी पिटाळून लावले. 12 व्या षटकात वॅटसनला बाद करण्याची संधी मनीष पांडेला साधता आली नाही. त्याने लाँगऑनवर झेल घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण, त्याबद्दल त्याला खात्री नव्हती. त्यामुळे तिसऱया पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. चेंडू जमिनीवर आदळल्याचे रिप्लेत स्पष्ट झाले.
वॅटसन व रायुडू यांनी खराब चेंडूंचा उत्तम समाचार घेतला. अर्थात, नंतर केवळ एका षटकाच्या अंतरातच हे दोन्ही फलंदाज बाद झाले. प्रारंभी, 16 व्या षटकातील दुसऱया चेंडूवर अहमदने रायुडूला लाँगऑफवरील वॉर्नरकडे झेल देणे भाग पाडले तर नटराजनने 17 व्या षटकातील दुसऱया चेंडूवर वाईड आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील फुलटॉसवर शेन वॅटसनला पांडेकरवी झेलबाद केले होते. धोनीने मैदानात आल्यानंतर डावातील 17 व्या षटकात नटराजनला सलग दोन चौकार फटकावले. पण, नंतर धावगती उंचावण्याच्या प्रयत्नात तो सोपा झेल देत बाद झाला. नटराजनच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरवरुन चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात धोनीने विल्यम्सनकडे सोपा झेल दिला.
पुढे डेव्हॉन ब्रेव्होला पहिल्याच चेंडूवर अहमदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत व्हावे लागले तर दीपक चहर 2 चेंडूत 2 धावांवर नाबाद राहिला. अंतिम टप्प्यात रविंद्र जडेजाने 10 चेंडूत 25 धावांची आतषबाजी करत लक्षवेधी फलंदाजी साकारली. त्याच्या खेळीत 3 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला.
धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स : सॅम करण त्रि. गो. संदीप शर्मा 31 (21 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. बेअरस्टो, गो. संदीप शर्मा 0 (1 चेंडू), शेन वॅटसन झे. पांडे, गो. नटराजन 42 (38 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), अम्बाती रायुडू झे. वॉर्नर, गो. अहमद 41 (34 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), महेंद्रसिंग धोनी झे. विल्यम्सन, गो. नटराजन 21 (13 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा नाबाद 25 (10 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), डेव्हॉन ब्रेव्हो त्रि. गो. अहमद 0 (1 चेंडू), दीपक चहर नाबाद 2 (2 चेंडू). अवांतर 5. एकूण 20 षटकात 6 बाद 167.
गडी बाद होण्याचा क्रम
1-10 (फॅफ डय़ू प्लेसिस, 2.1), 2-35 (सॅम करण, 4.4), 3-116 (अम्बाती रायुडू, 15.2), 4-120 (शेन वॅटसन, 16.2), 5-152 (धोनी, 18.6), 6-152 (बेव्हो, 19.1).
गोलंदाजी
संदीप शर्मा 4-0-19-2, खलील अहमद 4-0-45-2, नदीम 4-0-29-0, टी. नटराजन 4-0-41-2, रशीद खान 4-0-30-0.
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. व गो. करण 9 (13 चेंडू), जॉनी बेअरस्टो त्रि. गो. जडेजा 23 (24 चेंडूत 2 चौकार), मनीष पांडे धावचीत (ब्रेव्हो) 4 (3 चेंडू), केन विल्यम्सन झे. ठाकुर, गो. शर्मा 57 (39 चेंडूत 7 चौकार), प्रियम गर्ग झे. जडेजा, गो. शर्मा 16 (18 चेंडूत 1 चौकार), विजय शंकर झे. जडेजा, गो. ब्रेव्हो 12 (7 चेंडूत 1 षटकार), रशीद खान स्वयंचीत गो. शार्दुल 14 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शाहबाज नदीम झे. व गो. ब्रेव्हो 5 (1 चेंडूत 1 चौकार), संदीप शर्मा नाबाद 1 (2 चेंडू), टी. नटराजन नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 8 बाद 147.
गडी बाद होण्याचा क्रम
1-23 (वॉर्नर, 3.3). 2-27 (मनीष पांडे, 3.6), 3-59 (बेअरस्टो, 9.5), 4-99 (प्रियम गर्ग, 14.4), 5-117 (विजय शंकर, 16.4), 6-126 (विल्यम्सन, 17.2), 7-146 (रशीद, 18.6), 8-146 (नदीम, 19.3)
गोलंदाजी
दीपक चहर 4-0-28-0, सॅम करण 3-0-18-1, रविंद्र जडेजा 3-0-21-1, शार्दुल ठाकुर 2-0-10-1, कर्ण शर्मा 4-0-37-2, डेव्हॉन ब्रेव्हो 3-0-25-2, पियुष चावला 1-0-8-0.