प्रतिनिधी / सातारा :
कोरोना काळात शासकीय पातळीवर उपचारासाठी तात्काळ इमारत उपलब्ध होत नव्हती. तेव्हा संग्रहालयाची इमारत उपयोगी आली. परंतु आता कोरोना कमी झाला अन् प्रशासनाने अखेर इमारतीला टाळा लावून इमारत सील केली आहे. ही इमारत संग्रहालयाची असून संग्रहालयाकडे केव्हा हस्तांतरीत होणार? असा प्रश्न शिवभक्तांना पडू लागला आहे. दरम्यान, पुरातत्व विभागाकडून त्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची जेव्हा एन्ट्री झाली तेव्हा रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी शासनाच्यावतीने संग्रहालयाच्या इमारतीत जम्बो हॉस्पिटल सुरु करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने संग्रहालयास नवीन संग्रहालय इमारतीची मागणी केली होती. त्यानुसार पुरातत्व विभागाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून त्यास परवानगी दिली होती. सध्या कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने जम्बो कोविड हॉस्पीटल बंद करण्यात आले आहे. परंतु नवीन संग्रहालय इमारत मूळ मालकाकडे म्हणजे पुरातत्व विभागाकडे देणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता नवीन संग्रहालय इमारतीला कूलूप बंद सील लावून मुख्य गेट ही सीलबंद केले आहे. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवीन संग्रहालय लवकर होईल का नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पुरातत्व विभागाने सुद्धा संग्रहालय ताब्यात देण्याविषयी पत्रव्यवहार केला आहे. परंतु त्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे शिवप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहेत.