एचडीएफसीमध्ये घसरण ः जागतिक घडामोडींचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात मागील तीन दिवसांच्या तेजीला अखेर मंगळवारच्या सत्रात विराम मिळाला. सेन्सेक्समध्ये 359.33 अंकाची घसरण राहिली आहे. जागतिक बाजारात युरोपच्या शेअर बाजारात घसरण व कच्च्या तेलाच्या किमती तेजीत राहिल्याच्या कारणास्तव सेन्सेक्स व निफ्टी घसरणीसह बंद झाले आहेत.
मंगळवारी जीडीपीचे आकडे सादर होण्याच्या अगोदरच गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. यासह देशातील चलनातील घसरणीचा प्रभावही शेअर बाजारावर झाला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 359.33 अंकांनी घसरुन निर्देशांक 55,566.41 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76.85 अंकांच्या पडझडीसोबत 16,584.55 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी मंगळवारच्या सत्रात सन फार्माचे समभाग सर्वाधिक 3.11 टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, टायटन, इन्फोसिस, ऍक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा, टाटा स्टील आणि आयटीसी यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
अन्य घडामोडींचा परिणाम
जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किमती उच्चांकावर राहिल्याने भारतावर तेल आयातीचा अतिरिक्त दबाव पडण्याची शक्यता आहे. यामध्ये युरोपीय संघाच्या रशियातून तेल आयातीवर काही प्रमाणात बंदी असल्याने कच्च्या तेलाच्या किमती 120 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलपेक्षाही अधिक राहिल्या आहेत.
जागतिक पातळीवर चीनने कोरोना संबंधीत सर्व निर्बंध मागे घेतले असून आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कॉस्पी व चीनचा शांघाय कम्पोझिट व हाँगकाँगचा हँगसेंग हे मजबूत राहिले.