-`तरुण भारत’च्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल
-`आरोग्य’मध्ये स्थानांतरण होऊन देखील `बांधकाम’मध्ये होता कार्यरत
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेत महिनाभरापूर्वी राबविलेल्या स्थानांतरण प्रक्रियेत बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याचे `आरोग्य’मध्ये स्थानांतरण झाले होते. तरीही आरोग्यमध्ये हजेरी नोंदवून तो `बांधकाम’मध्ये कार्यरत होता. लाभाच्या खुर्चीला चिकटून बसल्यामुळे त्याच्या ठिकाणी स्थानांतरणाने आलेल्या कर्मचाऱ्याची कुंचंबना झाली होती. याबाबत `आरोग्यमध्ये स्थानांतरण, काम बांधकाम विभागात’ या मथळ्याखाली 30 सप्टेबर रोजी तरुण भारत मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत जि.प.प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यास आरोग्यमध्ये तत्काळ रुजू होण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्याने शनिवारी `आरोग्य’च्या कामास सुरुवात केली.
2013 नंतर रेंगाळलेली स्थानांतरण प्रक्रिया सीईओ चव्हाण यांनी पारदर्शीपणे राबवली. त्यानुसार बहुतांशी कर्मचारी नव्या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यांनी काम देखील सुरु केले. पण बांधकाम विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्याचा जवळचा पाहुणा असलेल्या एकाचे (कनिष्ठ सहाय्यक) `आरोग्य’मध्ये स्थानांतरण झाल्यानंतरही तो `बांधकाम’मध्ये कार्यरत होता. हा कर्मचारी आरोग्य विभागात हजर झाला, पण त्याने पदभार स्विकारलेला नव्हता. तो मूळ ठिकाणीच कार्यरत होता. याबाबत `तरुण भारत’ने आवाज उठवल्यानंतर अखेर तो कर्मचारी आरोग्य विभागात रुजू झाला.