सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना अपयश
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ, बाबले गल्ली येथील रहिवासी यल्लाप्पा चिंतू बाबले (वय 47) हे अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
यल्लाप्पा हे अंध होते. त्या परिस्थितीतही ते कॅलेंडरची विक्री फिरून करत होते. शहापूर, वडगाव, अनगोळ या परिसरात दरवषी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये ते कॅलेंडर विक्री करत होते. रविवार दि. 28 रोजीही ते कॅलेंडर विक्री करून माघारी फिरत असताना त्यांना आरपीडी रोडवरील कॅनरा बँकसमोर दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर इजा पोहोचली होती.
या घटनेनंतर अनगोळ येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. 13 रोजी सकाळी 8 वाजता अनगोळ स्मशानभूमीत होणार आहे.