प्रतिनिधी / सातारा :
शहरात विसावा नाका परिसरात दि.12 रोजी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते नाचवत नंगानाच केला होता. गाडयाची तोडफोड करत काही जणांना जखमी करुन लुटमार केल्याची घटना घडली होती. त्याच कोयता गँगने यापूर्वी अनेक गुन्हे केले आहेत. काही गुह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे तर काही गुन्हे हे पोलीस ठाण्याकडे नोंद नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी या गँगच्या अखेर मुसक्या आवळल्या. गँगचे म्होरक्या अभिजीत राजू भिसे (वय 18 वर्ष रा सैदापूर सातारा) व त्याचा साथीदार अमिर सलीम शेख (वय 19 वर्ष रा वनवासवाडी सातारा) या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अल्पवयामध्येच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला अभिजीत भिसे याचे कारनामे पिरवाडी परिसरात चांगलेच गाजले आहेत. त्याने एका युवकास जीवंत जाळले होते. त्या प्रकरणातून वय कमी असल्याने पिसे विधी संघर्ष बालक ठरुन बाहेरच होता. त्याचा साथीदार असलेला अमिर शेख याचा वडिल सलिम शेख हेही गुन्हेगारी वृत्तीचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या पाऊलावर पाऊल अमिरने टाकले आहे. कोणत्या गुह्यातून कसे बाहेर पडायचे हे सलिम शेख यांना माहिती असल्याने अमिरला अनेकदा बाहेर काढले. त्याच्यावरही दरोडय़ाचा गंभीर गुन्हा आहे. या गँगची दहशत अलिकडे वाढू लागली आहे. दि. 12 रोजी विसावा नाका येथे सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास दुचाकीवरुन मिसरुड फुटलेल्या पाच ते सहा युवकांनी हातात कोयते नाचवत धिंगाणा घातला होता. त्यावरुन शिवाजी संदीपान सरगर (रा. शिक्षक कॉलनी, जुना आरटीओ ऑफिस शेजारी सदरबझार) यांच्या ओमिनी गाडीस दुचाकी आडवी मारुन आडवले. त्यांच्या ओमिनी गाडीची काच फोडून टाकली. अचानक घडलेल्या प्रकाराने ते भयभीत झाले. त्यांच्या पोटाला कोयता लावून त्यांच्या खिशातून 2 हजार 700 रुपये काढून नेले होते. पुढे हे टोळके खेड फाटा सातारा येथे गेले. तेथे उमेश आप्पाराव गायकवाड (रा.लक्ष्मीटेकडी सदरबझार सातारा) यांच्या डोक्यात कोयता मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, पैशाचे पाकीट त्यामध्ये रोख रक्कम 1हजार100 रुपये, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पोस्टचे कार्ड घेवून पळुन गेले होते. त्याबाबतची फिर्यादही सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हे गुन्हे गंभीर स्वरुपाचे असल्याने पोलीस अधिक्षक सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी भेटी देवून सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आण्णासाहेब मांजरे व तपासी अधिकारी नानासाहेब कदम यांना गुह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम व त्यांच्या पथकास आरोपीचा तात्काळ शोध घेवून ताब्यात घेण्याच्या सुचना देवून मार्गदर्शन केले. या गुह्यातील गुन्हेगार हे सराईत असल्याने ते पोलिसांच्या हाती लागायचे नाही यासाठी दडून बसले होते. त्यांचा शोध गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व कर्मचारी कसोशीने घेत होते. दि.16रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक आरोपीचा शोध घेत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय माहितीदारांमार्फत माहिती मिळाली की, फरारी आरोपी हे गोडोली परिसरात आले आहेत. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावला असता अभिजीत राजू भिसे (वय 18 वर्ष रा सैदापूर सातारा), अमिर सलीम शेख (वय 19 वर्ष रा वनवासवाडी सातारा) हे तेथे आले असता त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात आणले.त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दारु पिण्याकरीता पैसे पाहिजे असल्याने गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. या दोन आरोपींना अटक केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोउनि नानासाहेब कदम हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो.हवा.प्रशांत शेवाळे, पो.ना. शिवाजी भिसे, पो.ना. अविनाश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, किशोर तारळकर यांनी सहभाग घेतला.