प्रतिनिधी/ वास्को
गेले सहा महिने मुरगाव बंदरात आश्रय घेतलेले आणि गोव्याच्या सागरी पर्यावरणावर गंभीर संकट निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेले नु शी नलीनी हे बहुचर्चित इंधनवाहू जहाज अखेर लवकरच अरबी देशांकडे प्रयाण करणार आहे. या जहाजाच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झालेली असून या जहाजाची खरेदी ग्लोबल टॅकर्स या कंपनीने साडे तेरा कोटीं रूपयांच्या बोलीने केली आहे.
एमपीटीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी नु शी नलीनी जहजाचा लिलाव झाला. आठ दिवसांपूर्वीच या जहाजातील नाफ्ता दुसऱया जहाजात खाली करून तो खरेदी केलेल्या कंपनीने बेहरीनला पाठवला होता. आता नु शी नलीनी जहाजही अरबी देशांकडे रवाना होणार आहे. हे जहाज सध्या मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक नऊवर नांगरण्यात आलेले असून ते युनायटेड अरब आमिरेटस्कडे रवाना होण्यासाठी सज्ज झालेले आहे. मात्र, हे जहाज मुरगाव बंदराचा निरोप नक्की कधी घेईल हे स्पष्ट झालेले नाही. मुरगाव बंदरातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंदरातून बाहेर पडण्यासाठी या जहाजासंबंधी बरेच सोपस्कर नव्या जहाज मालकाला पूर्ण करावे लागणार आहेत. त्यानंतरच या जहाजाची बंदर सोडण्यासाठी वाट मोकळी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली या जहाजाच्या लिलावाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. ग्लोबल टॅकर्स या कंपनीने साडे तेरा कोटींच्या बोलीने हे जहाज खरेदी केले आहे. हे जहाज खरेदीसाठी अन्य किती कंपन्यांचा या लिलाव प्रक्रियेत सहभाग होता याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हे जहाज लिलावात खरेदी करण्यात आलेले असले तरी या जहाजाचा ताबा अद्याप नव्या मालकाकडे देण्यात आलेला नाही. मात्र, हे जहाज आता दुरूस्तीकामासाठी एखादय़ा सुक्या गोदीचा आश्रय घेणार असून त्यानंतर हे जहाज पुन्हा इंधन वाहतुकीच्या सेवेत रूजू होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. सध्या एमपीटी या जहाजासंबंधी नव्या मालकाच्या संपर्कात आहे. जहाजाच्या खरेदी व्यवहारातून उपलब्ध होणाऱया साडे तेरा कोटींवर जहाज तारण असलेली बँक आणि एमपीटीचा दावा असणार आहे.