10 एप्रिलपासून पॅसेंजर होणार सुरू : एकूण 3 पॅसेंजर बेळगाववरून धावणार
प्रतिनिधी / बेळगाव
मागील वर्षभरापासून बंद असलेली पॅसेंजर रेल्वे पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. 10 एप्रिलपासून बेळगाववरून 3 पॅसेंजर रेल्वे धावणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली जात होती. बेळगावमधील अनेक संस्था व संघटनांनी या संदर्भात रेल्वे विभागाला पत्रव्यवहारही केला होता. याचेच फलित म्हणून पॅसेंजर रेल्वे सुरू होत असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. परंतु या पॅसेंजर रेल्वे केवळ शेडबाळपर्यंतच धावणार असल्याने मिरजपर्यंत प्रवास करणाऱयांची निराशा झाली आहे.
बेळगाव शहरावर आसपासच्या भागातील अनेकजण उपजिविकेसाठी अवलंबून आहेत. बेळगावमध्ये असलेल्या शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, उद्योग यामध्ये दररोज रेल्वेतून येणाऱयांची संख्या सर्वाधिक आहे. कॅसलरॉक, लोंढा, शेडबाळ, घटप्रभा, गोकाक, या परिसरातून शेकडो नागरिक दररोज बेळगावला येतात. अत्यंत कमी खर्चात रेल्वेचा सुखकर प्रवास असल्याने पहिली पसंती ही रेल्वेलाच असते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च 2020 पासून पॅसेंजर रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते. यामुळे पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली जात होती.
हुबळी-शेडबाळ-हुबळी (07345/07346) ही रेल्वे 12 एप्रिलपासून धावणार आहे. सकाळी 11 वाजता हुबळी येथून निघालेली पॅसेंजर 12.46 वा. लोंढा, दुपारी 2 वा. बेळगाव तर सायंकाळी 5 वा. शेडबाळ येथे पोहोचणार आहे. सकाळी 7.30 वा. शेडबाळ येथून निघालेली रेल्वे 9.40 वा. बेळगाव तर दुपारी 2 वा. हुबळी येथे पोहोचणार आहे.
बेळगाव-शेडबाळ-बेळगाव (07347/ 07348) ही रेल्वे 12 एप्रिलपासून धावणार आहे. पहाटे 4 वा. बेळगाव येथून निघालेली रेल्वे सकाळी 6.35 वा. शेडबाळ येथे पोहोचणार आहे. तर सायंकाळी 5.30 वा. शेडबाळ येथून निघालेली रेल्वे रात्री 8.45 वा. बेळगावला पोहोचणार आहे.
बेळगाव-शेडबाळ-बेळगाव (07335/07336) ही रेल्वे 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सकाळी 8 वा. निघालेली रेल्वे 11.15 वा. शेडबाळ येथे पोहोचणार आहे. तर दुपारी 12 वा. शेडबाळ येथून निघालेली रेल्वे दुपारी 3.15 वा. बेळगावला पोहोचणार आहे.
निर्णय स्वागतार्ह
नैर्त्रुत्य रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पॅसेंजर बंद असल्याने बेळगाव शहरावर आधारलेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करत इतर प्रवास करावा लागत होता. बेळगावमध्ये शिक्षण, आरोग्य, व्यवसायासाठी येणाऱयांना पॅसेंजर रेल्वे सोयीची ठरणार आहे.
– सतीश तेंडोलकर (अध्यक्ष सिटीझन्स फोरम)
तीन रेल्वे…
- हुबळी-शेडबाळ (07345/07346) (12 एप्रिलपासून)
- बेळगाव-शेडबाळ (07347/07348) (12 एप्रिलपासून)
- बेळगाव-शेडबाळ (07335/07336) (10 एप्रिलपासून)