वॉर्डनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अखेर
वॉर्डनिहाय अंतिम मतदारयादी शुक्रवार दि. 9 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे महापालिका निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाबाबत धारवाड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी झाली नसल्याने हा वाद निकालात निघाला नाही. पण बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरविकास खात्याने व राज्य निवडणूक आयोगाने मनपा निवडणुका घेण्याच्यादृष्टीने हालचाली चालविल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरक्षण व त्या पाठोपाठ मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध करून आक्षेप नोंदविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारींचे निरसन करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. सदर मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे पत्र महापालिका कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्याने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण धारवाड उच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल निवडणूक आयोग व राज्य शासनाला बंधनकारक आहे. त्यामुळे याचिकेच्या निकालानंतरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.