प्रतिनिधी तरुण भारत संवाद / सोलापूर
मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील यमाई देवी मंदिरात चोरी झाल्याने मंदिर समितीला जाग आली असून, तत्काळ याची भीती विचारात घेऊन 13 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या आधीच हे कॅमेरे बसविले असते, तर चोरी टळली असती.
मार्डीच्या यमाई मंदिरात सोलापूर जिह्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भक्त गर्दी करतात. यमाई मंदिरात झालेल्या चोरीमध्ये 10 तोळयाच्या आसपास सोने, 50 किलो चांदी, तर दानपेटीतील रोख रक्कम दोन ते अडीच लाख चोरटय़ांनी चोरून नेली होती. चोरी करून जाताना चोरटय़ांनी देवीच्या चेहऱयावर वस्त्रांने झाकले होते. नवरात्र काळात मंदिरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर व त्याच खोलीतील सीलबंद कपाटातील एक ते दीड लाख रुपयांची नाणी चोरीला गेली होती. वारंवार अज्ञातांकडून दानपेटी फोडून त्यातील रक्कम व मौल्यवान वस्तू गायब होत आहेत. अशी तक्रार मंदिरातील आठ पुजाऱयांनी धर्मादाय आयुक्ताकडे 20 जुलै रोजी दाखल केली होती. तक्रारीनंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक जाधववर येऊन सीलबंद फोडलेल्या दानपेटीची पंचनामे केले. पण अद्यापही त्या चोरीचा छडा लागला नाही.
यमाई मंदिर परिसरात व देवीच्या गाभाऱयामध्ये एकूण 13 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. नवरात्र काळात डीव्हीआर चोरीला गेल्याने चोरटय़ाने मंदिरातील चोरी करण्याची संधी साधली. सीसीटीव्ही चालू असते तर चोरीचे चित्रण त्यामध्ये कैद होऊन चोरीचा तपास लागला असता. नवरात्र काळापासून सीसीटीव्ही चालू न करण्याचे गौडबंगाल काय, असा सवाल देवी भक्ताकडून वारंवार उपस्थित होत आहे. चोरीच्या धक्क्यानंतर बुधवारी मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस पाटील अमोल कदम व पोलीस उपनिरीक्षक दळवी यांच्या उपस्थितीत सुरू केले.