मनपा कर्मचाऱयांचा नाकर्तेपणा सामोरे
प्रतिनिधी / बेळगाव
गोवावेस येथे अनेक दिवसांपासून ड्रेनेजची पाईप फुटून दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या डेनेजची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार होत होती. परंतु त्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गोवावेस येथील रिक्षा चालकांनीच या ड्रेनेजची स्वच्छता केली. यामुळे मनपा कर्मचाऱयांचा नाकर्तेपणा समोर आला आहे.
पंचवटी गणेश मारुती मंदिर येथे डेनेज फुटून पाणी साचले आहे. यामुळे मंदिरात येणाऱया भक्तांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बाजूलाच हेस्कॉम कार्यालयात बील भरण्यासाठी येणाऱया नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. यापूर्वी डेनेजची स्वच्छता करण्याची मागणी वारंवार केली होती. परंतु याची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. अखेर येथील रिक्षास्टँडवरील रिक्षाचालकांनीच स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी अमित राऊत, शशी पाष्टे, अमर हजारे, प्रमोद कुरणकर, पाटील, लोकेश हुंदरे, राजू मजूकर, सागर पुजारी व इतर रिक्षाचालकांनी कचरा, बाटल्या बाहेर काढून स्वच्छता केली.
हेस्कॉम कार्यालयासमोर गटारी तुंबल्या
पेट्रोलपंपाच्या मागच्या बाजूला गटारी तुंबल्या आहेत. ड्रेनेजचे पाणी जाण्यास जागा नसल्याने हे पाणी साचून आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराईची भीती वर्तविली आहे. त्यामुळे ड्रेनेजचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याची मागणी होत आहे.