प्रतिनिधी/ लांजा
अडीच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या वाकेड ते लांजा या चौपदरीकरणाचे कामाने वेग घेतला आहे. वाकेड ते रेस्टहाऊस या अंतरादरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती चिंतामणी कन्स्ट्रक्शने दिली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या वाकेड ते लांजा या चौपदरीकरणाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत या महामार्गाच्या दुतर्फा असलेले काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच दिवाळी सण लक्षात घेऊन येथील स्थानिक छोटय़ा-मोठय़ा व्यापाऱयांना कोणतीही अडचण होऊ नये, या दृष्टीने दिवाळीनंतर लांजा बाजारपेठ व शहरातील रखडलेले काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या लांजा शहरातील चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.