प्रतिनिधी / बेळगाव :
तालुका पंचायतमध्ये 15 वा वित्त आयोगातून 8 कोटी मंजूर झाले आहेत. सामान्य फंडातून 2 कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे एकूण 10 कोटी निधी तालुका पंचायतला मंजूर झाला आहे. मात्र, यातील काही रक्कम अध्यक्ष व उपाध्यक्ष आपल्या अधिकाराखाली ठेवण्यासाठी प्रयत्न होत होता. मात्र हा प्रयत्न तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत हाणून पाडण्यात आला. तालुका पंचायतीचे सदस्य सुनील अष्टेकर, उदय सिद्दण्णावर यासह इतर सदस्यांनी अध्यक्षांना धारेवर धरत आलेला निधी सर्वांनाच समांतर वाटप करावा, अशी मागणी लावून धरली.
यावेळी अनेकांनी याला संमती दर्शवत अध्यक्षांच्या मनमानी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. काही निधी इमारतींसाठी राखीव ठेवावा, असे सांगण्यात आले असले तरी उर्वरित अनुदान समांतर वाटावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी साऱयाच सदस्यांनी एकच पवित्रा घेतल्यानंतर अध्यक्षांनी नमते घेणे पसंत करून सर्व निधी समांतर वाटण्याचे आवाहन करण्यात आले.
मागील वेळीही अध्यक्षांनी समांतर अनुदान वितरणाबाबत मोठा घोळ केला होता. यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता पुन्हा अध्यक्षांनी काही अनुदान आपल्या अधिकाराखाली ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याला विरोध करत तालुका पंचायतमध्ये अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांना चांगलेच सुनावण्यात आले. यावेळी दिव्यांगांसाठी येणारे अनुदान आपल्या कार्यक्षेत्रात वापरण्यासाठी तब्बल 18 लाख रुपये अध्यक्षांच्या अधिकाराखाली ठेवण्याचे सांगण्यात आले. त्याला विरोध करत आपल्याच कार्यक्षेत्रात दिव्यांग आहेत का, आमच्या कार्यक्षेत्रात नाहीत का? असा सवाल करत सर्वत्रच याबाबतचे अनुदान समांतर वितरित करावे, असे आवाहन केले.
तालुका पंचायतमधील गांधी भवन सभागृहात ही बैठक झाली. यावेळी आलेल्या अनुदानाचे समांतर वाटप करण्यावरून मोठा गदारोळ माजला. तालुका पंचायतमधील महाराष्ट्र एकीकरण समिती, भाजप आणि काँग्रेसमधील काही सदस्यांनी समांतर फंड वितरित करण्याबाबत सभागृहात आवाज उठविला. त्यामुळे अध्यक्षांची चांगलीच पंचाईत झाली.
यावेळी तालुका पंचायतच्या व्यासपीठावर ता.पं.चे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, अध्यक्ष शंकरगौडा पाटील, उपाध्यक्ष मारुती सनदी, तहसीलदार कुलकर्णी होते. नीरा काकतकर, लक्ष्मी मेत्री, एन. के. नलवडे, आप्पासाहेब किर्तने, निलेश चंदगडकर, काशिनाथ धर्मोजी यांच्यासह इतर तालुका पंचायत सदस्य उपस्थित होते.