2000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता
@ बालासोर / वृत्तसंस्था
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेकडून (डीआरडीओ) ओडिशाच्या बालासोर किनाऱयावर शनिवारी ‘अग्नि प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने पूर्णपणे अचूकतेने सर्व मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1,000 ते 2,000 किलोमीटर इतकी आहे. ‘अग्नि प्राईम’ ही अग्नि वर्गातील क्षेपणास्त्राची नवीन पिढीची अपग्रेडेड आवृत्ती आहे. अण्वस्त्रसक्षम क्षेपणास्त्र ‘अग्नि प्राईम’मध्ये अनेक नवीन वैशिष्टय़े जोडण्यात आली असल्याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱयांनी दिली. या क्षेपणास्त्रामुळे लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे.
ओडिशाच्या तटावर अब्दुल कलाम बेटावरून ‘अग्नि प्राईम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. अत्याधुनिक ट्रकिंग रडारद्वारे क्षेपणास्त्राच्या मार्गावर देखरेख ठेवण्यात आली होती. याच प्रकारातील इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेत ‘अग्नि प्राईम’ वजनाने हलके आणि आकाराने लहान आहे. या नव्या क्षेपणास्त्रामध्ये अनेक नव्या तांत्रिक बाबींचा समावेश केला आहे. अण्वस्त्रवाहू असलेल्या या क्षेपणास्त्राचे डिझाईन आणि त्याचा विकास डीआरडीओने केला आहे.
भारताने आतापर्यंत अग्नि सीरीजमधून 5 क्षेपणास्त्र तयार केली आहेत. ‘अग्नि प्राईम’मध्ये चार हजार किलोमीटरपर्यंत क्षमता असलेल्या अग्नि-4 आणि 5 हजार किलोमीटरच्या अग्नि-5 मधील काही तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र दोन स्टेज आणि सॉलिड इंधनावर आधारित आहे. प्रगत रिंग-लेसर जिरोस्कोपच्या आधारावर जडत्वीय नेव्हिगेशन सिस्टमद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. दोन्ही टप्प्यात एकत्रित रॉकेट मोटर्स आहेत. त्याची मार्गदर्शन प्रणाली इलेक्टो मेकॅनिकल ऍक्च्युएटर्ससह सुसज्ज आहे.