वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याची भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यान चंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात क्रीडा पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. गोव्याची युवा बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
यावेळी खेलरत्न पुरस्कार मिळणारा शरथ कमल हा एकमेव क्रीडापटू असून एकूण 15 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली होती. त्यात बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, एसएच प्रणॉय, महिला बॉक्सर निखत झरीन, ऍथलेट्स एल्डहॉस पॉल, अविनाश साबळे यांच्यासह अन्य खेळाडूंचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात खास आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्व क्रीडापटूंना माननीय मुर्मू यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
जीवनज्योत सिंग तेजा (तिरंदाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा शिरूर (पॅरा नेमबाजी), सुजीत मान (कुस्ती) यांचे द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे तर दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंग यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अश्विनी अकुंजी (ऍथलेटिक्स), धरमवीर सिंग (हॉकी), बी.सी. सुरेश (कबड्डी), निर बहादुर गुरुंग (पॅरा ऍथलेटिक्स) यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल ध्यान चंद जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. ट्रान्सस्टेडिया एंटरप्रायजेस प्रा. लि. यांना 2022 राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जाईल. नवोदित खेळाडूंचा शोध व उदयोन्मुख युवा प्रतिभावंतांना घडविण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे
मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कार ः अचंता शरथ कमल
अर्जुन पुरस्कार विजेते ः भक्ती कुलकर्णी व आर. प्रज्ञानंद (बुद्धिबळ), सीमा पुनिया, अविनाश साबळे, एल्डहोस पॉल (ऍथलेटिक्स), लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित, निखत झरीन (बॉक्सिंग), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (ज्युडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सायकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओव्हळकर (मलखांब), इलावेनिल वलरिवन, ओमप्रकाश मिठरवाल (नेमबाजी), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (वेटलिफ्टिंग), अन्शू, सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी गिशिश्चंद्र जोशी, तरुण धिल्लन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल संजय पाटील (पॅरा जलतरण), जर्लिन अनिका जे. (डेफ बॅडमिंटन).
प्रशिक्षकासाठी द्रोणाचार्य पुरस्कार ः जीवनज्योत सिंग तेजा (तिरंदाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा शिरूर (पॅरा नेमबाजी), सुजीत मान (कुस्ती).
जीवनगौरव पुरस्कार ः दिनेश लाड (क्रिकेट), बिमल घोष (फुटबॉल), राज सिंग (कुस्ती).
ध्यान चंद जीवनगौरव पुरस्कार ः अश्विनी अकुंजी (ऍथलेटिक्स), धरमवीर सिंग (हॉकी), बी.सी.सुरेश (कबड्डी), निर बहादुर गुरुंग (पॅरा ऍथलेटिक्स).
मौलाना अबुल कलम आझाद (एमएकेए) ट्रॉफी ः गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर.