दोन दिवसात तब्बल दोन लाखांची मदत : कुटुंबियांनी व्यक्त केले ऋण : लॉकडाऊनमध्येही अनेकांची सढळ हस्ते मदत
तेजस देसाई / दोडामार्ग:
दोन दिवसांपूर्वी ‘तरुण भारत’मध्ये तेरवण येथील 14 वर्षीय मुलीला उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पाटील कुटुंबाला लॉकडाऊन असूनही सढळ हस्ते अनेक दात्यांनी भरघोस मदत केली. शुक्रवारी दुपारपर्यंत जवळपास दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये इतकी मोठी रक्कम जमा झाली. या दातृत्वामुळे अचलालाही जगण्याची नवी उमेद मिळाली आहे.
‘तरुण भारत’ मध्ये तेरवण येथील धनगर समाजातील व गरीब कुटुंबातील मुलगी अचल पाटील हिच्यावरील कॅन्सर उपचारासाठी मदतीची हाक देण्यात आली होती. सध्याचे अर्थचक्र पाहता प्रत्येकाला पैसे जपून वापरायचे आहेत, अशी स्थिती आहे. अनेकांच्या नोकऱया गेल्या, बेकारी वाढली. मात्र, 14 वर्षीय आठवीत शिकणाऱया अचलला मदतीचा आकडा पाहता माणुसकीचा झरा कितीही संकटे आली तरी आटत नाही, याचा प्रत्यय आला. दात्यांमध्ये दोडामार्ग (सिंधुदुर्ग), चंदगड (कोल्हापूर), गोवा, महाराष्ट्र एवढेच काय देश-विदेशात नोकरीला असणाऱया अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे अचलवर पुढील उपचार होऊ शकले व तिची तब्येत धोक्याबाहेर आली. ‘तरुण भारत’ व दात्यांचे आभार मानण्यासाठी धनगर समाज संघटना, विविध सामाजिक प्रतिनिधींनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधी तेजस देसाई यांची भेट घेत दात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अनेकांनी ‘तरुण भारत’ वृत्त बनविले चळवळ
खरंतर अनेकांनी अचलला मदत केली. पण, साऱया नावांचा उल्लेख करणे शक्य नसल्याने सुरुवातीला माफी मागतो. ‘तरुण भारत’ चे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर हे वृत्त न राहता एक चळवळ बनली व बातमी अनेक माध्यमांवर शेअर झाली. त्यातून संवेदना जागली आणि पाटील कुटुंबाला आधार मिळाला. दात्यांचे ऋण मानू तरी कसे, असे सांगत ही घटना आयुष्यभर विसरता न येणारी असल्याचे अचलच्या वडिलांनी सांगत ज्यांनी मदत दिली त्यांचे आभार मानले.
मदतीची चळवळ निर्माण करणाऱयांमध्ये प्रदीप गावडे, प्रसाद सावंत, करण शेटकर, राजेश नाईक, एकनाथ जानकर, सखाराम झोरे, महेश काळे, विजय फाले, सिद्धू काळे, राजू भोसले, मोहन गवस, कुलदीप पाटील, अरुण खामकर, अर्जुन शेटवे, धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग, शशांक देसाई, शुभम नाईक, समीर ठाकुर, गणपत डांगी, वासुदेव वेर्णेकर, धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई शाखा दोडामार्ग, बाबुराव धुरी, संस्कृती फाउंडेशन, मुंबई, जयवंत खोराटे, कान्होबा माळवे, पुरुषोत्तम आढाव, स्वयंप्रभा बित्तंबात ग्रुप, भगतसिंग ऍकॅडमी, महिला ब्रिगेड, चंदगड, संजय गांधी विद्यालय, नागणवाडी, रामेश्वर पाटील-नंदूरबार, सुनील फडके, संदीप ओऊळकर, महेश पाटील आणि मित्रमंडळ चंदगड, संतोष झोरे, अनिल लांडगे, अनिरुद्ध देसाई, रामकृष्ण दळवी, शुभम नाईक, अमोल देसाई, राजू मसुरकर, सिद्धेश माळकर, स्वप्नील पांगम यांचा समावेश आहे. शिवाय अन्य काहींनी मदतीसाठीचे वृत्त व्हायरल केले. स्वत: मदतही केली.