वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयावरुन जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधासंबंधी नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तसेच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे.
“कोरोना व्हायरसवर उपचारासाठी मी लाखो डोस खरेदी केले आहेत. दोन कोटी ९० लाखापेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. भारतातून भरपूर औषधे येणार आहेत. तुम्ही निर्बंध हटवू शकता का? असे मी मोदींना विचारले. ते महान आहेत. ते खूपच चांगले आहेत. भारतासाठी औषधांची आवश्यकता असल्याने त्यांनी हे निर्बंध घातले होते” असे ट्रम्प म्हणाले.
हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. पण भारत सरकारने त्याआधीच औषध विक्रीच्या धोरणामध्ये बदल झाल्याचे अमेरिकेला कळवले होते.