अजगराला जाळतानाचा व्हिडीओ पडला महागात
राजापूर
अजगराला मारुन जाळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे एका कुटुंबाच्या चांगलेच अंगलट आले आहे. हे कृत्य करणाऱया तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. विजय भिकाजी पारकर (53), वंदना विजय पारकर (44), मानसी मंगेश पारकर (27, सर्व रा. नाटे पडवनेवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाटे-पडवनेवाडी येथील विजय पारकर, वंदना पारकर, मानसी मंगेश पारकर यांना 22 जून रोजी सांयकाळी 6 वाजता कोंबडीला अजगर खात असताना आढळला. यावेळी कावरच्या सहाय्याने त्यांनी अजगराला मारले व नारळाच्या झावळय़ा टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. अर्धवट जाळलेला अजगर व कोंबडी त्यांचे घरामागे असलेल्या ओढय़ाजवळ नेऊन टाकले. या सर्व घटनेचा व्हिडीओ करून त्यांनी तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवार 23 रोजी नाटे पडवनेवाडी येथे पाहणी केली. यावेळी अर्धवट जाळलेला अजगर वनविभागाने ताब्यात घेऊन राजापूर पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून शवविच्छेदन करून शव नष्ट केले. अजगराला मारल्याप्रकरणी वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपांनी गुन्हा कबूल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.
मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर व्हि क्लेमेट बेन, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक पोपटराव खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन बाबुराव निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रियंका लगड, राजापूर वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक कोर्ले सागर पताडे, वनरक्षक वनउपज तपासणी नाका साखरपा संजय रणधीर यांनी ही कार्यवाही पार पाडली. वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत अजगर प्राण्याची शिकार किंवा मारणे हा गुन्हा आहे. या कायद्यांतर्गत 3 वर्षापर्यंत कारावास शिक्षा किंवा 25 हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीनजीक आल्यास किंवा संकटात सापडल्यास वनविभागास तत्काळ कळविण्यात यावे, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.