याची शिक्षा मिळणार असल्याचे पंतप्रधानांचे वक्तव्य
आसामच्या कोक्राझार येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गमोसाच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. एक चित्रफित प्रसारित होत असून यात एआययुडीएफ प्रमुख बदरुद्दीन अजमल हे गमोसा (आसामधील एकप्रकारचा गमछा) परिधान करण्यास नकार देताना दिसून येतात. पंतप्रधान मोदींनी याच चित्रफितीद्वारे अजमल यांना लक्ष्य केले आहे.
आसामची ओळख, आसामच्या बहिणींच्या कष्टाचे प्रतीक, गमोसाचा उघड अपमान करण्यात आल्याचे पूर्ण आसामने बुधवारी पाहिले आहे. आसामवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती, ही छायाचित्रे पाहून व्यथित आहे, संतप्त आहे, या अपमानाची शिक्षा काँग्रेसला मिळणारच, असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
आसामच्या युवकांमध्ये फुटबॉल अत्यंत लोकप्रिय आहे, याचमुळे त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास काँग्रेस आणि त्याच्या महाअसत्याला पुन्हा ‘रेडकार्ड’ दाखविण्यात आले आहे, आसामच्या विकासासाठी, येथील शांतता आणि सुरक्षा तसेच सन्मान आणि संस्कृतीच्या सुरक्षेसाठी आसामच्या लोकांचा विश्वास रालोआवर असल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेसने एक महाअसत्य (महाआघाडी) तयार करून पुन्हा एकदा कोक्राझारसह पूर्ण बोडोलँडचा छळ करण्याची तयारी चालविली आहे. ज्या पक्षांच्या नेत्यांनी कोक्राझारला हिंसाचाराच्या आगीत लोटले होते, काँग्रेसने आज स्वतःचा हात अशा लोकांना सोपविल्याचा आरोप मोदींनी केला आहे.