तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपायुक्त पंकज जावळे यांना गेल्या महिन्यात कार्यमुक्त केले. परंतु उपायुक्त अजयसिंह पवार यांची इतरत्र बदली झाली असतानाही त्यांना अदयाप पर्यंत कार्यमुक्त केले नाही. अजयसिंह पवार हे आयुक्तांचे वसुलदार आहेत, असा आरोप उपमहापौर राजेश काळे यांनी केला असून पवार यांना त्वरीत कार्यमुक्त करावे, अशी लेखी मागणी उपमहापौर राजेश काळे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून महापालिकेत पुरेसे अधिकारी नियुक्त केले असल्याने उपायुक्त अजयसिंह पवार यांची इतर बदली केली आहे. मात्र उपायुक्त पवार यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कचरा संकलन व वाहतूक मक्तेदार यांना गाडयाचे जीपीएस रेकॉर्ड तपासून बीले अदा करणे आवश्यक असताना त्यांच्याकडून टक्केवारी घेउन बिले अदा केली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे अजयसिंह पवार यांना तत्काळ कार्यमुक्त करावे. त्यांच्या ठिकाणी येणारे अधिकारी अवताडे हे रूजू होत नसतील तर उपायुक्त बापट यांच्यावर रूजू न झाल्याबद्दल ज्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. त्याप्रमाणे अवताडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे लेखी निवेदनात उपमहापौर काळे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही. तर उपायुक्त अजयसिंह पवार यांना उपमहापौर राजेश काळे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देणयास टाळाटाळ करत दूरध्वनी बंद केला.