अजय देवगनच्या तान्हाजी चित्रपटाद्वारे यंदा मराठमोळा अभिनेता धैर्यशीलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तानाजीच्या सैन्यातल्या मावळय़ाच्या भूमिकेत दिसलेल्या धैर्यशीलने नोबेल पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध स्पॅनिश कवी पाब्लो नेरुदा ह्यांच्या मराठी अनुवादीत कवितेचे वाचन केलेला एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर टाकला आहे.
सध्याच्या नैराश्यग्रस्त वातावरणातून बाहेर येऊन सकारात्मकतेने वाटचाल करण्यासाठी पाब्लो नेरुदांची ही कविता खूप प्रेरित करेल असे धैर्यशीलला वाटते. तो म्हणतो, सध्या नैराश्य, चिंता आणि काळजीचे वातावरण वैश्विक स्तरावर पाहायला मिळतेय. पाब्लो नेरुदा हे विश्वकवी होते. त्यांची To Start Dying Slowly ही कविता कुठे तरी आपली सध्याची मनस्थिती दर्शवणारी आणि परिस्थितीतून मरगळ झटकून पुढे वाटचाल करायला प्रेरित करणारी आहे, असे मला वाटते. सध्या आपण घरी अडकलो आहोत. आपली पुढची वाटचाल कशी असावी ह्याचा विचार करायची, मन:चिंतन करायची खरे तर हीच वेळ आहे. धैर्यशील पुढे म्हणतो, या मूळ कवितेचा अनुवाद असलेली ‘तुम्ही मरताय हळूहळू’ ह्या कवितेचा गाभा लक्षात घेऊन आत्मचिंतन केले तर कवितेतले तत्वज्ञान निश्चितच नैराश्यातून बाहेर काढायला मदत करणार आहे. मला कायम असे वाटत आलंय की, आपण हल्लीची पिढी खूप सुपरफिशीअल आयुष्य जगत आलोय. आणि कुठेतरी ही कविता आपल्याला जगण्याचा खरा दृष्टिकोन देते, असे त्याने सांगितले.