नागोर्नो-काराबाखच्या अनेक भागांवर केला कब्जा : अनेक देशांचा युद्धात अप्रत्यक्ष सहभाग : जीवितहानी वाढली
वृत्तसंस्था/ बाकू
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यात सुरू असलेले युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. तुर्कस्तान आणि इस्रायलच्या शस्त्रास्त्रांमुळे अजरबैजानच्या सैन्याने नागोर्नो-काराबाखच्या अनेक भागांवर नियंत्रण मिळविल्याचा दावा केला आहे. या युद्धात आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर रशिया-अमेरिकसह अनेक देशांनी विनाअट युद्धविरामाची मागणी केली आहे.
दोन्ही देश परस्परांच्या सैन्याला मोठे नुकसान पोहोचविल्याचा दावा करत आहेत. आर्मेनियाचे सैन्य आणि नागोर्नो-काराबाखमधील सहकाऱयांनी मिळून अजरबैजानचे अनेक ड्रोन्स पाडविल्याचा दावा करण्यात आला आहे. आर्मेनियाचे रणगाडे आणि अनेक सैन्यतळ नष्ट केल्याचे अजरबैजानने म्हटले आहे.
पुतीन सरसावले
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोलियन पशिनियन यांच्याशी फोनवरून चर्चा करत स्थिती जाणून घेतली आहे. पुतीन आणि पशिनियन यांनी नागोर्नो-काराबाखच्या क्षेत्रात सुरू असलेल्या युद्धावरून 6 दिवसांमध्ये तिसऱयांदा फोनवरून चर्चा केल्याचे क्रेमलिनकडून सांगण्यात आले आहे. तुर्कस्तानच्या चिथावणीखोर विधानांमुळे पुतीन संतप्त असल्याचे समजते.
रशिया अन् तुर्कस्तान
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील वाढत चाललेल्या युद्धात रशिया आणि तुर्कस्तान सामील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रशिया एकीकडे आर्मेनियाला समर्थन करत आहे. तर अजरबैजानला नाटो आणि इस्रायलची साथ मिळाली आहे. आर्मेनिया आणि रशियात संरक्षण करार आहे. तर अजरबैजानचे हे हल्ले आर्मेनियाच्या भूमीवर झाल्यास रशिया यात हस्तक्षेप करू शकतो.
तुर्कस्तान, इस्रायलची साथ
अजरबैजानसोबत तुर्कस्तान आणि इस्रायल उभे आहेत. या संकटावर शांततापूर्ण तोडगा काढणे शक्य आहे, परंतु आर्मेनिया याकरता इच्छुक नसल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे. आर्मेनिया किंवा अन्य कुठल्याही देशाच्या आक्रमक कारवाईच्या विरोधात अजरबैजानच्या जनतेसोबत यापुढेही उभे राहू असे तुर्कस्तानने म्हटले आहे. तुर्कस्तानचा इशारा रशियाच्या दिशेने होता असे मानले जात आहे. तर इस्रायलही अजरबैजानला घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहे.
60 टक्के शस्त्रास्त्रs इस्रायली
आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील युद्धात तुर्कस्तान आणि पाकिस्तानही सामील आहे. हे दोन्ही देश स्वतःकडील दहशतवाद्यांना अजरबैजानच्या बाजूने लढण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. अजरबैजानच्या एकूण शस्त्रास्त्रखरेदीचा 60 टक्के हिस्सा इस्रायलकडून येतो. अशा स्थितीत इस्रायली शस्त्रास्त्रांमुळेच अजरबैजानचे सैन्य वरचढ ठरत आहे. तर रशिया आर्मेनियाला उघडपणे समर्थन देण्यास चालढकल करत आहे.