कोरानाच्या पार्श्वभुमीतही १८ टक्के बोनसमुळे कामगार, कर्मचार्यांची दिवाळी गोड
प्रतिनिधी / सातारा
सातारा- स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने उभारलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे आज राज्यात आर्थिकदृष्ट्या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जात आहे. सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. शासनाने इथेनॉलनिर्मीती बाबत घेतलेले धोरण सकारात्मक असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे आणि पर्यायाने ऊस पुरवठादार शेतकर्यांना चांगला दर देता येत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, अशी ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून उत्साहात पार पडला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांच्यासह विविध मान्यवर आणि संचालक उपस्थित होते. सध्या कोरोना महामारीमुळे अनेक संसार उध्वस्थ झाले आहेत. बिकट आणि गंभीर परिस्थिती असली तरी कामगार, कर्मचारी हे कारखान्याचा कणा आहेत, हे विसरून चालणार नाही. कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे असून त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी संचालक मंडळाने कामगार कर्मचार्यांना १८ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी जाहिर केले. तसेच येत्या १ तारखेपासून रोख स्वरुपात एकरकमी कामगारांना बोनसची रक्कम वाटप केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
व्हा. चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. संचालक महेंद्र पवार यांनी आभार मानले कार्यक्रमास कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पंचायत समिती सभापती . सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, यांच्यासह अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व आजी माजी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, बिगर सभासद आणि कामगार कर्मचारी उपस्थित होते.