ऑनलाईन टीम / सातारा :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरुन त्यांचा पीए बोलत असल्याची बतावणी करत पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरला 20 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केल्नी आहे.
किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे आणि चैतन्य राजेंद्र काकडे अशी अटक करण्यात आलेल्या आरेपींची नावे आहेत. याप्रकरणी बिल्डर अतुल जयप्रकाश गोयल यांनी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोयल यांचा वाडे बोल्हाई येथील एका जागेसाठी एका वाद सुरू होता. त्या वादाचा फायदा घेत आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून फेक कॉल ऍप डाऊनलोड केले. त्या ऍपवर अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक वापरून गोयल यांना मुख्य आरोपी किरण काकडे याने फोन केला. गोयल यांना त्यावेळी अजित पवार यांच्याकडून फोन आल्याचे वाटले. फोनवरुन आपण अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय. हवेली तालुक्यातील वाढे बोल्हाई येथील जागेचा वाद मिटवून टाका, अन्यथा जागेत पाऊल ठेवून देणार नाही. तसेच धमकावून 20 लाखांची खंडणी मागण्यात आली. फिर्यादींनी त्यानंतर आरोपींना दोन लाख रुपये दिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करीत आहेत.