मुंबई/प्रतिनिधी
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत आहेत. याआधी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. आता सोमय्यांनी पवार कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यांनतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवारांना नोटीस पाठवली आहे. आयकर विभागाने पाठवलेली नोटीस हा ठाकरे सरकार आणि अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.
पवारांच्या मालमत्तावर कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस अजित पवार यांना पाठवण्यात आल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. कालच सोमय्या यांनी अजित पवारांकडे एक हजार कोटींहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचे आरोप केले होते. या प्रकरणामध्ये सोमय्या यांनी अजित पवारांची आई, पत्नी आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या जावयाचाही हात असल्याचा आरोप केला होता. तर अजित पवारांनी आपण कोणताही गैरप्रकार केला नसल्याचं म्हणत आरोप फेटाळून लावले होते. पण सोमय्यांनी आरोप केल्यांनतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांना आयकर विभागाने नोटीस पाठवून संपत्ती कायदेशीर असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले आहे.