ऑनलाईन टीम / मुंबई :
केंदीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याकडून आपल्याला काय निधी मिळणार, असा प्रश्न माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला होता. त्यावर अजित पवार यांनी सुक्ष्म आणि लहान खात्यातून आपल्याला काय निधी मिळणार, अशी टीका राणेंवर केली होती. त्या टीकेला राणेंनी आज प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार अज्ञानी आहेत. त्यांनी त्यांच्या खात्याकडे लक्ष्य द्यावे, मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, असा पलटवार राणे यांनी केला.
जनआशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे आज कणकवली येथे आहेत. तेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे त्यांना केंद्राकडे हात पसरावे लागत आहेत. राज्यातील शेतकरी, पुरग्रस्त आणि एसटी कर्मचाऱयांना पगार द्यायला राज्य शासनाकडे पैसे नाहीत. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही. गुन्हे लपविण्यासाठी एका रात्रीत शपथ घेणाऱयांनी मला तोंड उघडायला लावू नये, असा इशाराही राणे यांनी दिला.