ऑनलाईन टीम / बारामती :
बारामतीमध्ये अजित पवार यांनी आज स्वतः रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. अजित पवारांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी पियाजिओ कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षेची ट्रायल घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) ट्रायल घेतली. यावेळी कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक रिक्षाची त्यांनी बारकाव्याने पाहणी केली.
बदलत्या काळानुसार आता पियाजिओ व्हेईकल्स कंपनीने इलेक्ट्रिक वाहननिर्मिती संशोधन व उत्पादनांवर भर द्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे व्यक्त केली. पियोजिओ कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या उद्देशातून बारामती नगरपालिकेस तीन इलेक्ट्रिक, एक सीएनजी व एक पेट्रोलवरील अशा पाच रिक्षा दिल्या आहेत.
पुढे ते म्हणाले, भविष्यात पेट्रोल डिझेलच्या वाहनांच्या वापरावर मर्यादा येणार आहेत, प्रदूषण टाळण्यासह स्वस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. एसटी देखील या पुढे इलेक्ट्रिकवरच्याच खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे, या पार्श्वभूमीवर पियाजिओ कंपनीनेही आता इलेक्ट्रिक व सीएनजी गॅसच्या वापराच्या वाहनांच्या संशोधन व उत्पादनावर भर द्यायला हवा, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.