ऑनलाईन टीम / पुणे :
ज्यांचे डिपॉझिट वाचत नाही त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभे राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊन पठ्ठ्याचे डिपॉझिट जप्त होते. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय, अशा शब्दात अजित पवार यांनी पडळकरांचे नाव न घेता टीका केली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्याचे आजच अनावरण केले. मात्र या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण उरकून घेतले तसेच यावेळी त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली. याबाबत अजित पवारांना विचारण्यात आले असता ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी सुचलीय. त्यांचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभे राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. एवढे काय महत्त्व देताय, अशा शब्दात पवारांनी पडळकरांवर निशाणा साधला.