संकेश्वर कमतनूरवेसनजीकची घटना : हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक सज्ज
प्रतिनिधी /संकेश्वर
व्याजाने पैसे देणाऱया महिलेला अज्ञातांनी बंदुकीतून गोळय़ा झाडून ठार मारल्याची घटना रविवार 16 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कमतनूरवेस येथे घडली. हल्लेखोरांनी सदर कृत्य केल्यानंतर घटनास्थळावरुन तात्काळ पोबारा केला. घटनास्थळी गोळीबारामागच्या कारणाविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. हल्लेखोरांनी एकाचवेळी सदर महिलेवर तीन गोळय़ा झाडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. गौराबाई ऊर्फ शैलजा निरंजन सुभेदार (वय 55 रा. कमतनूरवेस) असे मृत महिलेचे नाव आहे.
सदर घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, रविवारी पहाटे 4 ते सकाळी 8 यावेळेत सुभेदार यांच्या घराच्या दुसऱया मजल्यावर जाऊन हल्लेखोरांनी गोळीबार केला असावा. नेहमीप्रमाणे सदर महिलेला भेटायला गेलेल्या नातेवाईकाला हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती तात्काळ संकेश्वर पोलिसांना कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळे यांनी आपल्या फौजफाटय़ासह घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
मृत महिलेच्या छातीवर एक, हातावर एक व डोक्यावर एक अशा तीन ठिकाणी बंदुकीतून गोळय़ा झाडल्याचे आढळून आले. रक्ताच्या थारोळय़ात मृतदेह होता. दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी, चिकोडीचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक, पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
हल्लेखोरांनी नियोजनबद्ध गोळीबाराचा कट रचल्याने घटनास्थळी काहीच पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे तातडीने बेळगावहून पूजा नामक श्वानास, ठसेतज्ञ व लॅब पथकाला पाचारण करण्यात आले. सलग आठ तासाच्या पाहणीनंतर दुपारी 4.15 वाजता मृतदेह शववाहिकेतून बेळगाव येथील शवागारात हलविला. त्यामुळे गोळय़ा कोणत्या बंदुकीमधून झाडल्या व किती वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला, याची माहिती उपलब्ध होणार आहे.
मोठय़ा संपत्तीची एकटीच मालकीन
शैलजा हिचे माहेर कमतनूरवेशीतील पाटील घराणे आहे. तिचा 40 वर्षांपूर्वी संकेश्वरातील निरंजन सुभेदार यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक अपत्य झाले होते. पण दोन वर्षातच आजाराने त्याचे निधन झाले. दरम्यान, पती निरंजन यांचेही निधन झाले. या दृर्दैवी घटनेतून शैलजा एकटी पडली होती. तिने चतुराईने सासरची व माहेरकडील संपत्ती लाटली व त्यातून ठिकठिकाणी शेती जागा घेऊन धनिक बनली. हाती लागलेले पैसे तिने व्याजाने फिरवण्यास सुरुवात केली. व्याजाने पैसे देण्यासह कर्जदारांना दमदाटी करणे, त्यांचा अपमान करणे असे प्रकार तिने सुरु केला. त्यामुळे ‘डॅशिंग बाई’ अशी चर्चा सुभाषरोड कमतनूरवेसमध्ये होती. कर्जवसुली अन् तगादा यातून सदर महिलेचा अखेर खात्मा केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. सदर घटनेची संकेश्वर पोलिसांत नोंद झाली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी एक पथक रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आर्थिक व्यवहारातून कृत्य
गौराबाई उर्फ शैलजा निरंजन सुभेदार ही काही वर्षांपासून गरजूंना व्याजाने पैसे देत होती. तिने सुमारे 20 लाख रुपये कर्ज दिल्याचे समजते. त्यापैकी 17 लाख परत मिळाले होते. उर्वरित व्याजासह पाच लाख रुपयांची रक्कम रविवारी देण्याचा तगादा सुभेदार हिने कर्जदारांकडे लावल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याशिवाय अन्य काही लोकांना तिने व्याजाने पैसे दिले होते. व्याजाने दिलेले पैसे वेळेत न मिळाल्यास कर्जदारांना मारबडव व दम देण्याचे काम शैलजा करत होती, अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.