ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीची स्पेशल सेलच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे.
आज सकाळी अज्ञाताने कार घेऊन अजित डोवाल यांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या सुरक्षा दलांनी त्याला गेटवरच पकडले. त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, स्पेशल सेल त्याची चौकशी करत आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे दिसून येते. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून, ती कार त्याने भाडय़ाने आणल्याचे समजते. त्याला लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले आहे.
एनएसए अजित डोभाल हे नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते.