वाठार किरोली / वार्ताहर :
रहिमतपूर ते कोरेगाव मार्गावर निगडी ता. कोरेगाव गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस गंभीर जखमी झाला. निसर्गमित्र आकाश राऊत व व्यंकटेश शेट्टी यांनी तात्काळ वनविभाग बचाव दलाच्या मदतीने जखमी तरसावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात रवानगी केली.
रहिमतपूर ते कोरेगाव मार्गावर असलेल्या ओढ्यावगळी व आडमार्गांवर परिसरातील हॉटेल्स, ढाबा चालकांनी उघड्यावर टाकलेले खरकटे अन्न तसेच कुक्कुटपालन, चिकनसेंटर वरील फेकलेल्या मांसाहारी टाकाऊ पदार्थ्यांच्या दुर्गधीमुळे ते खाण्यासाठी भटक्या कुत्र्याप्रमाणेच दोन पुर्ण वाढ झालेल्या दोन तरसांचा रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात परिसरात वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान सासुर्वे फाटा ते निगडी दरम्यान रात्री अज्ञात भरधाव वाहनाने एका तरसाला ठोकर दिली. यात गंभीर जखमी झालेला तरस लगतच्या झाडीत निपचिप पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडले. त्यांनी ही घटना ओळखीच्या खंडाळा येथील निसर्गमित्र रवी पवार यांना कळविली. रवी पवार यांनी तात्काळ घटनास्थळापासून जवळ असणाऱ्या रहिमतपूर येथील निसर्गमित्र आकाश राऊत व वाठारकिरोली येथील व्यंकटेश शेट्टी यांना कळविले. त्यानी लगेचच कोरेगाव वनविभागाचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांना माहिती दिली.
वनविभागाच्या पोहोचलेल्या पथकातील वनपाल देशमुख, वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी गर्दीवर नियंत्रण केले. दरम्यान निसर्गमित्र रवी पवार यांच्या सह सातारा वनविभाग बचाव दल देखील घटनास्थळी पोहचले. बचाव दल व निसर्गमित्रांनी तरसाची उपचारासाठी पुणे येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात रवानगी केली. कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे, वनरक्षक रोहित लोहार यांनी चांगली कामगिरी केली.