प्रतिनिधी / सातारा
किल्ले अजिंक्यताऱ्यांच्या समोरील उंटांचा डोंगर येथून बिबट्या पलीकडे पाटेश्वरच्या डोंगराकडे पुणे – बंगळूर महामार्ग ओलांडून जाताना शुक्रवारी शेंद्रे (ता. सातारा) गावानजीक अनोळखी वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यूचा झाला. मृत पावलेल्या बिबट्यावर वन विभागाकडून शव विच्छेदन सुरू आहे, अशी माहिती वन विभागाच्या शीतल राठोड यांनी दिली.
बिबट्याचा वावर हा किल्ले अजिंक्यतारा परिसर, यवतेश्वरचा डोंगर, उंटांचा डोंगर, जानाई मळाईचा डोंगर, पाटेश्वरचा डोंगर असा आहे. तर बिबट्या महामार्ग ओलांडून अलीकडे पलीकडे करतो. काल सकाळी 11.30वाजण्याच्या सुमारास महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत पुलाच्या पुढे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या रस्त्यावर मृत अवस्थेत पडल्याचे इतर वाहनधारकानी वन विभागास कळवले. वन विभागाच्या पथकाने तेथे जाऊन पाहणी केली.
पंचनाम करून मृत बिबट्यास सातारा येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात आणण्यात आले. तेथे शवविच्छेदन सुरू आहे. अपघातात बिबट्याच्या जबड्यास व डोक्यास मार लागला आहे, असे वन विभाच्या शीतल राठोड यांनी सांगितले.