प्रतिनिधी / महाबळेश्वर :
रानातून जनावरे घेऊन मुख्य रस्त्यामार्गे घरी परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बाबुराव जनू डोईफोडे (वय 65, रा देवी चौक,(सांगलीकर बांगला, महाबळेश्वर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शहरापासून जवळ असलेल्या मेढा-सातारा मुख्य रस्त्यावर ल मेरिडिअन हॉटेलनजीक झाला. याबाबतची तक्रार तुकाराम बबन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाबुराव डोईफोडे हे नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी रानामध्ये घेऊन गेले होते. अंधार पडल्याने सायंकाळी सातच्या सुमारास सर्व जनावरे घेऊन मेढा सातारा या मुख्य रस्त्यमार्गे घराकडे परतत असताना ल मेरिडिअन या हॉटेलनजीक पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापद झाली. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाने बाबुराव डोईफोडे याना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची तक्रार तुकाराम बबन शिंदे यांनी पोलीस ठाण्यात केली असून पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री अधिक तपास करीत आहेत.