वारणानगर / प्रतिनिधी
वाठार बोरपाडळे राज्य मार्गावर वारणानगर ता. पन्हाळा येथील वारणा तालमी समोर दुचाकीस वाहनास पाठीमागून एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जाफळे, ता. पन्हाळा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर सर्जेराव बाळू पोवार (वय ४०) हे मृत्यूमुखी पडले.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, सर्जेराव पोवार हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ कोल्हापूर येथील सिपीआर रुग्णालयात उपचारासाठी नेले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये दुचाकीच्या पाठीमागील बाजूचे मोठे नुकसान झाले असून आज्ञाताविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड करत आहेत त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.