कोरोना विरोधी लढय़ाकरता दिग्गज उद्योजक आणि क्रीडा तसेच मनोरंजनसृष्टीतील लोकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. दानशूरांच्या यादीत विप्रो ही माहिती-तंत्रज्ञान कंपनी तसेच अझीम प्रेमजी फौंडेशनचे नाव सामील झाले आहे. दोघांनी मिळून 1125 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. परंतु ही रक्कम पीएम केअर्स अंतर्गत दिली जाणार नाही.
विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अजीम प्रेमजी फौंडेशन मिळून 1125 कोटी रुपयांची मदत करणार आहेत. या रकमेत प्रेमजी फौंडेशनचा मोठा वाटा असणार आहे. विप्रो लिमिटेडचे 100 कोटी, विप्रो इंटरप्रायझेसकडून 25 कोटी तर फौंडेशन 1 हजार कोटींचे यात योगदान आहे. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या व्यतिरिक्त असणार आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आरोग्य आणि मानवी संकटाच्या पार्श्वभूमीवर 1125 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही रक्कम संकटग्रस्त लोकांची मदत, आरोग्य सुविधांवर खर्च केली जाणार आहे. फौंडेशनच्या 1600 कर्मचाऱयांचे पथक हे मदतकार्य करणार असल्याचे विप्रो समुहाने म्हटले आहे.